केज भुमीअभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार/नागरिक झाले त्रस्त?
केज/प्रतिनिधी
केज उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे भोंगळ कारभार सुरू आहे. वारसाने नोंद फेरफारसाठी सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही नोंद घेण्यास अधिकारी असमर्थता दर्शवित असल्याने या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कार्यालयात केज शहर व ग्रामीण भागातील जनता मोजणी, वारसान फेरफार, विक्री नोंदी घेण्यासाठी अर्ज करीत असतात. मात्र नागरिकांच्या अर्जावर योग्य तो निर्णय घेवून निकाली काढणे आवश्यक असताना त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. या कार्यालयात अनेक प्रकरणे प्रलंबित असून कामचुकार कर्मचाऱ्यामुळे जनता त्रस्त झाली आहे.या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कुणाचाही वचक नसून सध्या कार्यरत असलेल्या उपअधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम होत आहे. आपल्या अर्जाचे काम झाले का, याकरिता विचारणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना योग्य माहिती दिली जात नाही व उद्धटपणे बोलून हाकलून लावले जाते.काही कर्मचारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चिरीमिरीची मागणी करून सतावत असतात. विविध कामासाठी व फेरफार, मोजणीचे अर्ज लवकरच निकाली काढून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची नोंद घेवून सैरावैरा सुटलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.कार्यालयातील काही कर्मचारी सूचविलेल्या कामाकडे दुर्लक्ष असतात असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















