शनिशिंगणापूर देवस्थान घोटाळा/‘त्या’ सातशे पानांच्या अहवालात लपलीय लुटारुंची कुंडली! स्थावर मालमत्तेसंदर्भात विश्वस्त आणि अधिकाऱ्यांचे नातेवाईकही रडारवर !
प्रशांत बाफना / अहिल्यानगर
जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानच्या विविध प्रकारच्या घोटाळ्यांचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर गाजतो आहे. बनावट ॲप, क्यु आर कोड किंवा स्कॅनरच्या माध्यमातून शनिभक्तांनी मोठ्या भक्तीभावाने दिलेल्या दानावर या देवस्थानच्या अनेक विश्वस्त आणि अधिकाऱ्यांनी दिवसा ढवळ्या दरोडा टाकला असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे या देवस्थानच्या अनेक विश्वस्त आणि अधिकाऱ्यांनी स्वतः ऐवजी नातेवाईकांच्या नावे विविध ठिकाणी जमिनी खरेदी केल्या असल्याचं आता उघडपणे बोललं जात आहे. काहीही असलं तरी या देवस्थानला लुटणाऱ्या संबंधित लुटारुंची कुंडली मात्र सरकारी यंत्रणेनं तयार केलेल्या ‘त्या’ सातशे पानांच्या अहवालात लपली आहे, हे सांगायला कोणा ज्योतिषाची अजिबात आवश्यकता नाही.सोशल मिडियावर या घोटाळ्याची प्रचंड चर्चा आहे. ज्या विश्वस्त आणि अधिकाऱ्यांनी नातेवाईकांच्या नावे जमिनी खरेदी केल्या आहेत, ते नातेवाईक आता ‘नकोच ही नुसती झंझट’, ‘तुमच्या जमिनीत तुम्हालाच लख लाभ’ अशा पवित्र्यात दिसत आहेत. दरम्यान, विश्वस्त आणि अधिकाऱ्यांनी ज्या ज्या नातेवाईकांच्या नावे जमिनी घेतल्या आहेत, ते नातेवाईकही आता तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची अधिकृत माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.म्हणूनच मिळतेय विश्वस्तांना मुदतवाढ शनिशिंगणापूर देवस्थानच्या बनावट ॲप घोटाळा आणि अतिरिक्त नोकर भरतीच्या घोटाळ्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी अहवाल वाचून दाखवला. त्या दरम्यान स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही या घोटाळ्यासंदर्भात गंभीर आरोप केले. दरम्यान, या घोटाळ्यात देवस्थानची बाजू मांडण्यासाठी आणि फाईल सादर करण्यासाठी संबंधितांना आतापर्यंत तीनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे कुठं तरी पाणी मुरतंय की काय, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली. परंतू या घोटाळ्यासंदर्भात तब्बल सातशे पानांचा अहवाल तयार करण्यात आला असून तो तयार करण्यासाठी खरं तर जास्तीचा वेळ लागतो आहे. म्हणूनच शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांना वारंवार मुदतवाढ देण्यात येत असावी, अशाप्रकारचा तर्क लावण्यात येत आहे.घोटाळा दडपणं सत्ताधारी मंडळींना जड जाणार शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये विविध प्रकारच्या घोटाळ्यांची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या संदर्भात देवस्थानच्या परिसरात उपोषणसुद्धा करण्यात आलं होतं. भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावेळी आश्वासन दिलं होतं, की या घोटाळ्याची सखोल चौकशी केली जाणार. मात्र त्यानंतर या संदर्भात सरकारी पातळीवर कुठलीच हालचाल झाली नाही. त्यामुळे हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न तर सुरु नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात आली. परंतू विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच चौकशी अहवाल वाचून दाखवला, त्यानंतर हा घोटाळा दडपला जाण्याची शक्यता धूसर झाली. असं असलं तरी अद्यापही विविध सरकारी पातळ्यांवर जी काही चौकशी सुरु आहे, ती संथ गतीने सुरु आहे. कोणाला पक्षात घेऊन ‘पावन’ तर केलं जाणार नाही ना, अशीदेखील शंका व्यक्त केली जात आहे. परंतू आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नगर पंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये झालेला घोटाळा दडपून टाकणं हे सत्ताधाऱ्यांना खूपच जड जाणार असल्याचं जाहीरपणे बोललं जात आहे.





















