मुलांनो स्पर्धेला घाबरू नका/मीही जिल्हा परिषद शाळेतच घडलो /डिवायएसपी किरण खाडे साहेब यांची आनंदवाडी शाळेला सदिच्छा भेट!
अहिल्यानगर/प्रशांत बाफना जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवाडी, केंद्र- नायगाव तालुका- जामखेड या ठिकाणी “माझी शाळा माझा अभिमान” या उपक्रमा अंतर्गत श्री. किरण राजू खाडे साहेब यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.श्री. किरण खाडे साहेब हे जिल्हा परिषद शाळा आनंदवाडी शाळेचे माजी विद्यार्थी असून ते सध्या ओडिसा राज्यात आपले कर्तव्य बजावत आहेत.त्यांनी आज शाळेला सदिच्छा भेट दिली व विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती चौधरी मॅडम यांनी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांशी बोलताना ते म्हणाले, मी शाळेत असताना शाळेत भौतिक सोयी सुविधांची कमतरता होती. घरची परिस्थिती सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील होती. माझ्या मनातही इंग्रजी भाषेविषयी भीती होती .एक प्रकारचा न्यूनगंड होता .परंतु मी घाबरलो नाही .मी दिल्लीला स्पर्धा परीक्षेचे क्लास लावले. प्रचंड मेहनत घेतली व आज मोठ्या पदावर देशसेवा करण्याची मला संधी मिळाली आहे.पुढे ते म्हणाले की आज आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा वेगाने बदलत आहेत. सर्व जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण विकासाचे शिक्षण दिले जात आहे .आपली अहिल्यानगर जिल्हा परिषद मिशन आरंभ हा स्पर्धा परीक्षेसाठी पूरक असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे.मी सुद्धा याच आपल्या जिल्हा परिषद शाळेतच शिकून मोठ्या पदावर आहे. आपल्या आनंदवाडी जिल्हा परिषद शाळेतही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे . विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती चौधरी मॅडम यांच्या प्रयत्नांमुळे व पाठपुराव्यामुळे शाळेला ग्रामपंचायतच्या सहकार्याने व समाज सहभागातून सर्व भौतिक सोयी सुविधा मिळालेल्या आहेत.आपल्या गावातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य व सर्व पालकांच्या सहकार्यामुळे शाळेचा कायापालट झाला आहे.शाळेतील दोन्ही शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत त्याबद्दल त्यांनी दोन्ही शिक्षकांचे अभिनंदन केले.विद्यार्थ्यांना बोलताना ते म्हणाले की नियमित अभ्यास व सराव केला तर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकता. त्यामुळे मुलांनो तुम्ही कोणत्याही स्पर्धेला घाबरू नका. नियमित अभ्यास करण्याची सवय ठेवा.शिष्यवृत्ती परीक्षा, मिशन आरंभ इ.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सरावासाठी वेगवेगळ्या युक्त्या त्यांनी सांगितल्या.अभ्यास करत असताना झाडांची काळजी घ्या.मैदानावरील वेगवेगळ्या खेळांचा आनंद घ्या.मोबाईलचा वापर कमी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी गप्पा मारत असताना शाळेतील मुलींनीही त्यांना अनेक प्रश्न विचारले. पुनम गीते, अनुष्का सांगळे, ऋतुजा सांगळे, सानिका सांगळे, मोहिनी राख, वैष्णवी सांगळे, रुपाली सांगळे,कोमल वनवे या विद्यार्थिनींनी साहेबांना धीटपणे अनेक प्रश्न विचारले.श्री किरण खाडे साहेब यांच्यासोबत त्यांचे लहान बंधू आय.टी. इंजिनिअर प्रवीण खाडे हेही उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांशी हितगुज केले. काही पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काही अडथळा निर्माण झाला तर आम्ही अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही करू असे आश्वासन दोन्ही बंधूनी याप्रसंगी दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन उपशिक्षक श्रीकृष्ण बोराटे सर यांनी केले.कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुजित राजू खाडे यांचेही सहकार्य लाभले.





















