शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांचा नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते गौरव/राज्यस्तरीय “आदर्श प्राचार्य पुरस्काराने” डॉ. चंद्रसेन कोठावळे सन्मानित !
पाचोड (प्रतिनिधी) :-
येथील शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना नुकताच राज्यस्तरीय “आदर्श प्राचार्य पुरस्कार” जगप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ . तात्याराव लहाने यांच्या शुभहस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थीकेंद्री उपक्रम, सामाजिक बांधिलकी तसेच प्रभावी प्रशासकीय कार्यपद्धती याची दखल घेत दैनिक दैनिक लोकनेता च्या वर्धापन दिनानिमित्त भागवत पॅलेस परळी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या भव्य कार्यक्रमाला जीव्हीटी संस्थेचे संस्थापक मयंक गांधी, बाप आयटी कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे तसेच सावित्रीफेम प्रसिद्ध अभिनेत्री मेघना झुझुम, नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी, पोलीस निरीक्षक नाचनसाहेब, लोकनेताचे मुख्य संपादक ज्ञानेश्वर मुंढे, त्रिसींग जायभाय यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिक्षण क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा गौरव होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी गेल्या एक्केचाळीस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सामाजिक जनजागृती उपक्रम, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे त्यांची एक अभ्यासू आणि विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून ओळख निर्माण झाली.त्यांच्या नेतृत्वाखाली शिवछत्रपती महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. महाविद्यालयातील शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि समाजाभिमुख उपक्रमांमुळे महाविद्यालयाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रिय खासदार तथा श्री ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव संदीपान पाटील भुमरे, संस्था अध्यक्ष राजू नाना पाटील भुमरे, पैठणचे आमदार विलास बापू भुमरे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य शिवराज भैय्या भुमरे तसेच विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील शुभचिंतक मान्यवरांनी प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांचे अभिनंदन केले आहे.राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर पाचोडसह संपूर्ण परिसरातून प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे पाचोड परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.




















