“गुंड,खुनाचे आरोप असलेला मुख्य सूत्रधार कथीत समाजसेवक वाल्मीक कराड याचे उदात्तीकरण!
केज/प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुख खूनप्रकरणात गेल्या काही दिवसांपासून मुख्य आरोपी वाल्मिक कराडसाठी काहीजण समर्थन करत आहेत. आता तर कराडच्या नावे थेट स्कॅनर आणि बॅनर बीडमध्ये फिरत आहे.बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींना कौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. या कटातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे समोर आले. पण बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी स्कॅनर आणि बॅनर फिरत आहे. सोशल मीडियावर वाल्मिक कराडसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात धनंजय देशमुख यांची जळजळीत प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी याप्रकरणी लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले आहेत. या लोकप्रतिनिधींचीच फूस आरोपींच्या समर्थकांना असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.सोशल मीडियावर संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याचा फोटो लावून वाल्मिक कराडला बाहेर काढण्यासाठी आणि त्याचे नाव, फोटो सतत सोशल मीडियावर राहण्यासाठी आर्थिक निधी गोळा करण्यासाठी एक बॅनर काल पासून फिरत आहे. यावर प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख यांनी दसरा मेळाव्याच्या दरम्यान देखील आरोपीचे फोटो लावून पैसे गोळा करण्यात आल्याचा आरोप केला आहे.





















