धाकट्या पंढरीत आषाढी निमीत्त लाखो भाविकांची मांदीयाळी/संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाली महापुजा !
बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नारायण गड येथे आषाढी एकादशी निमीत्त रविवार दि.६ जुलै रोजी दर्शनासाठी रात्रीपासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पंचक्रोशीतील विविध वारकरी आषाढी निमित्त विठूमामाचा जयघोष करत टाळ- मूंगाच्या गजरात दिंडीच्या माध्यमातून पायी चालून गडावर दाखल झाले होते. तर जिल्ह्यासह मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातील विविध भागातून भाविकांची आषाढी एकादशी निमीत्त नारायणगडावर मांदीयाळी होती. दरम्यान यावेळी गडाचे महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज व मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते महापूजेसह विविध धार्मिक कार्यक्रम येथे संपन्न झाले. दरम्यान यावेळी विठूरायाच्या नामस्मरणाने व नगदनारायण महाराजांच्या जयघोषाने गडाचा परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.मराठवाडा ही साधु संतांची भुमी आहे याच मराठवाड्यामध्ये अनेक साधु संत जन्माला आले आणि भागवत धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी तसेच भगवंताच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य समर्पित केलेले आहे. याच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सोळाव्या शतकात स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा श्री संत नारायण महाराज यांनी स्थापन केलेल्या श्रीक्षेत्र नारायणगडाने महाराष्ट्राची धाकटी पंढरी अशी आपली ओळख निर्माण केली आहे. आषाढीवारी निमीत्त जे भक्त श्रीक्षेत्र पंढरपुरला जाऊ शकत नाहीत ते धाकटी पंढरी म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नारायणगड येथे येऊन विठ्ठल रुक्मिनी व नगदनारायण महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात. तर रविवार दि.६ जुन रोजी आषाढी एकादशी निमीत्त श्रीक्षेत्र नारायणगड येथे संस्थनाचे महंत शिवाजी महाराज व मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी व नगद नारायण महाराजाची महापुजा करण्यात आली. तसेच मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच आलेल्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. दरम्यान यावर्षी रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध ठिकाणी वाहनतळ केले होते. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पंचक्रोशीतील स्वयंसेवक तसेच बीड पोलिस स्टेशन, शिरुर पोलिस स्टेशन यांच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिरुर व बीडग्रामीण ठाण्याचे पोलीस तसेच होमगार्ड मंदिर परिसरात विविध ठिकाणी बंदोबस्तात तळ ठोकून होते. तर यावेळी आलेल्या भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून दर्शन रगिसह विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.





















