गटविकास अधिकारी यांच्या अनुपस्थितीत ग्रामसभेतील ठराव व मान्यता प्रश्नचिन्हाखाली अर्जदाराची चौकशी करून कार्यवाहीची मागणी!
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे जीवाचीवाडी येथील ग्राम सभेच्या दि.१६ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांची अनुपस्थिती,ग्रामसभेचा ठराव कसा मंजूर झाला आणि तो मान्यतेसाठी कसा सादर करण्यात आला याबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत.संबंधित प्रक्रिये मध्ये कायदेशीर व प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचाआरोप करत अर्जदार सुभाष सखाराम सारूक यांनी गटविकास अधिकाऱ्यांना लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे.अर्जदारांनी सादर केलेल्या तक्रारीनुसार, ग्रामसभेतील ठरावा संदर्भातील कागदपत्रे संपूर्णपणे अपूर्ण व संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. ग्रामसभेत मांडण्यात आलेला मुद्दा,त्यावर झालेली चर्चा,मंजुरीची प्रक्रिया,जबाबदार अधिकारी यांची उपस्थिती याबाबत कोणतीही स्पष्ट नोंद नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.तक्रारीत असे म्हटले आहे की,ग्रामसभा झाल्याचे सांगितले गेले असले तरी प्रत्यक्षात अर्जीदारांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.तसेच,ठराव मंजूर करण्याच्या प्रक्रियेत गटविकास अधिकाऱ्यांची अनुपस्थिती असूनही ठराव मान्य केल्याप्रमाणे नोंदी तयार करण्यात आल्या.यामुळे कागद पत्रांची विश्वासार्हता आणि संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शकता संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.याशिवाय,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनाच्या नावाने तयार करण्यात आलेली माहिती ही खोटी व अपूर्ण असल्याचा अर्जदारांचा दावा आहे.या संदर्भात संबंधित जबाबदार व्यक्तीं वर कारवाई करण्यात यावी व ग्रामसभेचे कागदपत्रात फेरफार करणाऱ्या घटकांची चौकशी करून वास्तविक माहिती उघडकीस आणावी,अशी मागणी करण्यात आली आहे.अर्जदारांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की,ग्रामसभेत कोणताही विषय योग्यप्रकारे मांडला गेला नसतानाही,बनावट पद्धतीने ठराव पारित झाल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे. प्रशासन व गटविकास विभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊनयोग्य ती तपासणी करावी, अन्यथा पुढील पातळीवर दाद मागण्याचा इशाराही अर्जदारांनी दिला आहे.ही तक्रार गटविकास अधिकारी,गट शिक्षणाधिकारी कार्यालय तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रतिलिपी सह पाठवण्यात आली असून,ग्रामपंचायतीतील व्यवहारातील संभाव्य गैरव्यवहाराबाबत चर्चा सुरू झाली आहे.





















