केज उपजिल्हा रुग्णालयातील रानभाज्यांच्या प्रदर्शनास प्रतिसाद !
केज/प्रतिनिधी
केज येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय पोषण सप्ताहनिमित गुणकारी रानभाज्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या भाज्यांचे फायदे कोणते याचे माहिती पत्रक आणि किशोरी मुली, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना समतोल सकस आहारविषयक माहिती देणारे भिंतीपत्रक ही लावण्यात आले होते.केज येथील उपजिल्हा रुग्णालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण झाल्यानंतर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांच्या हस्ते आयोजित गुणकारी रानभाज्याचे प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. या प्रदर्शनात गुणकारी रानभाज्यामध्ये अंबाडीची भाजी, घोळ भाजी, चंदा बटवा, माठ भाजी, करवले, पाथरीची भाजी, टाकळत्ची भाजी तरक्टा, तांदुळन्याची भाजी मांडण्यात आली. त्या सोबत संबंधित भाजीचे फायदे सांगणारे माहिती पत्रक ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर किशोरी मुलींसाठी कोणता समतोल आहार घ्यावा, गर्भवती महिलांनी कोणता आहार घ्यावा, स्तनदामातांनी कोणता आहार घ्यावा, स्वयंपाक करताना पोषक घटक टिकवण्यासाठी काय करावे, समतोल सकस आहार कोणता, लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय, रक्तक्षयाचा प्रतिबंध, पौष्टिकता वाढविण्याचे उपाय, धान्य डाळ व मोड आलेल्या कडधान्याचे विविध पदार्थ बनविणे, प्रथिने व उष्माकांच्या कमतरतेचे कुपोषण ही माहिती असणारे छायाचित्रांसह भिंतीपत्रक लावण्यात आली होती. हे प्रदर्शन आहार तज्ञ सुलक्षणा पाटील, समुपदेशक सौता गिरी यांनी परिश्रम घेऊन यशस्वी केले.कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेविक, कर्मचान्यांना गरोदर महिला उपस्थित होते





















