भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांची यशस्वी शिष्टाई शनिशिंगणापूरच्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांना मिळणार सहाव्या वेतन आयोगाचा फरक!
प्रशांत बाफना जिल्हा प्रतिनिधी/ अहिल्यानगर
शनिशिंगणापूर देवस्थानच्या कामगार युनियननं या देवस्थानच्या प्रशासकीय कार्यालयाला (आस्थापना) युनियनचे सभासद असलेल्या कामगारांना सहाव्या वेतन आयोगाचे फायदे मिळावेत, यासाठी काल (दि. ४) सुरु केलेलं आमरण उपोषण नेवासा भारतीय जनता पक्षाचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांच्या शिष्टाईमुळे आज (दि. ५) सकाळी स्थगित करण्यात आलं. उपोषणार्थी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची रक्कम फरकासह देण्याचे लेखी आश्वासन शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासकीय कार्यालयाच्यावतीने देण्यात आलं. त्यामुळे आज सकाळी 11 वाजता हे उपोषण स्थगित करण्यात आलं. या कामगारांना सहाव्या वेतन आयोगाचे फायदे मिळतील, असे या कार्यालयाने कामगार युनियनला दि. 5 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट 2024 च्या पत्रानुसार लेखी आश्वासन दिलेलं होतं. मात्र त्या आश्वासनाची पूर्तता अद्यापपर्यंत करण्यात आलेली नव्हती. परिणामी शनिशिंगणापूर देवस्थान कामगार युनियनच्या सभासद असलेल्या कामगारांनी आजपासून (दि. 4) आमरण उपोषण सुरु केलं. भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी उपोषणार्थी कामगारांची भेट घेत या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. दरम्यान, शेटे पाटील यांनी या संदर्भात शनिशिंगणापूर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून नक्की परिस्थिती काय आहे, हे जाणून घेतलं. कामगारांच्या 95 टक्के मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. मात्र पाच टक्के राहिल्या असून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील आणि या कामगारांना योग्यच न्याय मिळेल, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी दरंदले यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा प्रलंबित प्रश्न सुटल्यामुळे कामगारांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.





















