धोकादायक रस्ता प्रशासनाची उदासीनता – आ.कैलास पाटील यांचा संतप्त सवाल !
जनक्रांती न्युज/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी रामराजे जगताप
कळंब :-कळंब-लातूर मार्गावरील खडकी (ता. कळंब) गावाजवळील अरुंद पुलावर अपघात होऊन प्रशांत महाजन व मंगेश महाजन या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला यानंतरही संबंधित गुत्तेदार,अभियंता व कंत्राटदारांवर अद्याप कोणतीही कठोर कारवाई न झाल्यामुळे प्रशासनच त्यांच्या पाठिशी आहे का असा प्रश्न आमदार कैलास घाडगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे असा संतप्त इशाराही त्यांनी दिला आहे रामा-२३६ कळंब-लातूर मार्गावरील हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, लातूर यांच्याद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे रस्त्याची रुंदी वाढवण्यात आली असली तरी पुलांचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे पुलाजवळ कोणताही दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यानेच १५ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला या गंभीर घटनेनंतर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी १० मे २०२५ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र देऊन संबंधित अभियंता व कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्याआधीही त्यांनी कार्यकारी अभियंता लातूर (दि. २१ जून २०२४) व अप्पर मुख्य सचिव,सार्वजनिक बांधकाम विभाग,मंत्रालय, मुंबई (दि. ३० जुलै २०२४) यांना पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या मात्र आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
चौकट:-
[खडकी गावाजवळील अरुंद पुलामुळे झालेल्या अपघातानंतर कळंब पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविल्याचे पत्र आमदारांना दिले होते मात्र सदर अहवालावर काय कारवाई झाली, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही]
[कळंब तालुक्यातील करंजकल्ला गावाजवळील वळण ओळखता न आल्याने कळंब शहरातील व्यापारी युवक रमेश होनराव याचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेनंतर “जस्टिस फॉर रमेश” हा हॅशटॅग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे पुन्हा एकदा कळंब-शिराढोण-लातूर रस्त्यावरील धोकादायक वळणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे]
चौकट:-
[कळंब – शिराढोण – लातुर या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात झाले असून काही युवकांना प्राण गमवावे लागले आहेत नागरिकांमध्ये संतापाची भावना असून प्रशासनाने जर वेळीच ठोस कारवाई केली नाही तर आता जनतेला रस्त्यावर उतरावे लागणार आहे-आमदार कैलास घाडगे पाटील]





















