महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज !
केज/प्रतिनिधी
महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या पावन पर्वा निमित्त उत्तरेश्वर प्रिंपी येथील प्राचीन शिव मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर
गर्दी उसळली आहे.पहाटे पासूनच हर हर महादेव च्या जयघोषाने परिसर दुमदुमला असून हजारो भक्त भगवान शंकराच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट आणि धार्मिक वातावरणामुळे भक्तांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.महिलांसह युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित असून अनेकांनी रात्रभर जागरण करून अभिषेक व पूजा अर्चा केली. शिवलिंगावर बेलपत्र,दूध, दही,मध व पवित्र जल अर्पण करून भाविकांनी मनोभावे प्रार्थना केली. काही भक्तांनी उपवास पाळत महादेवाचे नामस्मरण केले.मंदिर समितीच्या वतीने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन,भजन आणि हरिपाठ यामुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले आहे.भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक प्रशासनानेही योग्य ती खबरदारी घेतली आहे.पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक व्यवस्थे साठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.गर्दी नियंत्रणासाठी स्वयं सेवकांची नियुक्ती करण्यात आली असून दर्शनासाठी स्वतंत्र रांगा तयार करण्यात आल्या आहेत.महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक उपचार केंद्र सुरू करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायत व स्थानिक कर्मचारी सतत कार्यरत आहेत.पिण्याच्या पाण्याची तसेच प्रसाद वितरणाची व्यवस्था सुरळीतपणे पार पडत आहे.भाविकांच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. काही ठिकाणी मोफत पाणी,चहा व फराळाचे वाटप करण्यात येत आहे. स्वयंसेवक भाविकांना मार्गदर्शन करत असून शिस्तबद्ध दर्शनासाठी सहकार्य करत आहेत.महाशिवरात्रीच्या निमित्ताने उतरेश्वर प्रिंपी येथे भक्ती,श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडत आहे. प्रशासन,मंदिर समिती आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे उत्सव शांततेत आणि व्यवस्थित पणे पार पडत आहे. महादेवाच्या कृपेने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत,अशी भावना भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.ही यात्रा आणखी दोन दिवस असणार आहे.





















