आदिशक्ती’ला नमन करतो. हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या ‘दुर्गे’पासून !
रायगड जिल्हा प्रतिनिधी /कैलासराजे घरत
नवरात्रीचा आज पहिला दिवस! कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या ‘आदिशक्ती’ला नमन करतो. हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या ‘दुर्गे’पासून… होय, बरोबर ओळखलंत त्या म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ! जिजाऊ: फक्त आईच नाही, हिंदवी स्वराज्याच्या खऱ्या शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा आपल्याला माहित आहे, पण त्या पराक्रमामागे होती जिजाऊंची दूरदृष्टी आणि अमोघ प्रेरणा. जिजाऊंचा जन्म जरी मातब्बर जाधव घराण्यात झाला असला तरी, त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी शिवरायांना रामायण, महाभारतातील फक्त गोष्टी सांगितल्या नाहीत, तर त्यांना पराक्रमी राजा बनवण्यासाठी लागणारे सर्व गुण शिकवले. त्यांनीच महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली. जिजाऊंचे आयुष्य म्हणजे एकप्रकारे स्वराज्याचीच पूर्वतयारी होती.दूरदृष्टी आणि नेतृत्व: जेव्हा शहाजी राजे दूर असताना पुण्याची जहागीर अत्यंत वाईट अवस्थेत होती, तेव्हा जिजाऊंनी लहानग्या शिवबांना घेऊन जहागिरीचा कारभार स्वीकारला. त्यांनी पडकी मंदिरे दुरुस्त केली, लोकांना पुन्हा वसवले आणि न्यायव्यवस्था प्रस्थापित केली. याच काळात त्यांनी महाराजांना राजकारणाचे धडे दिले.प्रेरणा आणि मार्गदर्शन: जिजाऊंनी शिवरायांना ‘स्वराज्य’ म्हणजे काय, याचा अर्थ समजावून सांगितला. त्यांच्या मनात रयतेच्या कल्याणाची, अन्याय दूर करण्याची आणि परकीयांच्या जोखडातून मुक्त होण्याची प्रेरणा त्यांनी जागवली. लाल महालात शाहिस्तेखानावर हल्ला करण्याचा धाडसी निर्णय असो किंवा अफजलखानाचा वध असो, प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाऊ महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या.कणखरपणा आणि त्याग: अनेक संकटांमध्ये त्या महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या एका शब्दावर महाराज मोठेमोठे निर्णय घेत असत. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर, स्वराज्याचा कारभार स्थिरावलेला पाहून त्यांनी आनंदाने पाचाड येथे देह ठेवला. खरंच, जिजाऊ म्हणजे कणखरपणा, त्याग, दूरदृष्टी आणि बुद्धिमत्तेचा त्रिवेणी संगम! त्या फक्त एका राजाच्या आई नव्हत्या, तर त्या संपूर्ण हिंदवी स्वराज्याच्याच माई होत्या! अखंड सेवेचे ठायी तत्पर शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक पत्रकार कैलासराजे घरत!





















