अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करा /मुंडेवाडी येथील ग्रामस्थांनी दारूच्या बाटल्या फोडून केला निषेध!
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील मुंडेवाडी गावामध्ये अवैद्य देशी दारू विक्रीमुळे गावातील अनेक लोकांचा जीव गेला आहे, हा अतिशय गंभीर गुन्हा असून यातील मुख्य आरोपी श्री नवनाथ गहिनीनाथ घोळवे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी भगवान बाबा चौकात दारूच्या बाटल्या फोडून केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंबाजोगाई चे एल सी पी विभागाचे पीएसआय श्री जगदीश कोरे साहेबांच्या टीमने मौजे मुंडेवाडी ता. केज जि. बीड येथील भगवान बाबा चौकात अवैधरित्या दारू विक्री करणारे श्री नवनाथ गहिनीनाथ घोळवे यांच्या दुकानावर धाड टाकून धंद्याच्या जायमोक्यावर मुद्देमालासह दारू पकडून व पंचनामा करून त्यांच्या दप्तरी गुन्हा नोंद केला आहे. परंतु नवनाथ घोळवे यांनी त्याच दिवशी दुपारनंतर आजतागायत सतत पुन्हा दारू विक्री करत आहे व ते लोकांना सांगत आहे की माझे पोलीस अधिकारी किंवा कोणीही काही वाकडे करू शकत नाही मी त्यांना त्यांच्या घरी हफ्ते पोहोच करीत आहे.गावामध्ये सदरच्या दारू विक्रीमुळे दारू पिऊन पाच पुरुष मृत्यू पावले आहेत. एकवीस वर्षाच्या आतल्या पाच महिला विधवा झाल्या आहेत. अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. यापुढेही गावात दारू विक्री चालू राहिली तर तरुण मुलं पुरुष दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन बनतील व मरतील अशी भीतीदायक परिस्थिती गावांमध्ये निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ज्येष्ठ नागरिक महिला तरुण मंडळ यांनी एकत्रित येऊन श्री नवनाथ गहिनीनाथ घोळवे हे गावात अवैधरीत्या देशी दारू विक्री करतात त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून गावातील दारू विक्री बंद करावी असा ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन ग्रामस्थांनी निषेध नोंदवला आहे.





















